मंगल कार्यालयांना स्वतःच लावावी लागेल कचऱ्याची विल्हेवाट
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने आता कडक पावले उचलली असून, मोठ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांसाठी 'तुमचा कचरा, तुम्हीच लावा विल्हेवाट' अशी नवी नियमावली तयार केली जात आहे. दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा तयार करणाऱ्या बल्क वेस्ट उत्पादकांचा कचरा यापुढे घंटागाड्या स्वीकारणार नाहीत. ज्या आस्थापनांकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्वतःची यंत्रणा नसेल, त्यांना
महापालिकेला शुल्क मोजूनच कचरा द्यावा लागणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने गुजरातच्या कंपनीमार्फत ४०० हून अधिक घंटागाड्यांद्वारे दररोज सुमारे साडेपाचशे टन कचरा संकलनाचे काम सुरू केले आहे.
ज्यांच्याकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसेल, त्यांना पैसे मोजून महापालिकेला कचरा द्यावा लागेल. शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने गुजरातच्या
कंपनीची नियुक्ती केली आहे.
ही कंपनी शहराच्या विविध भागांत ४०० पेक्षा जास्त घंटागाड्यांच्या माधमातून रोज सुमारे साडेपाचशे टन कचरा शहरातून उचलते. अनेक भागांत रस्त्यावर कचऱ्याचे साचलेले ढीग कंपनीच्या कामगारांनी स्वच्छ केले आहेत. बाजारपेठेत दिवसातून दोनवेळा कचरा उचलला जात आहे. रस्त्यावर फेकला जाणारा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र टेंपोची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रणकडे नोंदणी बंधनकारक
घनकचरा व्यवस्थापन नियम
२०२६ नुसार महापालिकेने स्वतंत्र नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांनुसार ओला कचरा, सुका कचरा तसेच इतर प्रकारच्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून संबंधित संस्थांनी त्यावर जागेवरच प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंग युनिट, बायोगॅस प्लांट किंवा इतर प्रक्रिया यंत्रणा उभारणे आवश्यक राहील. तसेच, सर्वांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
बल्क कचऱ्याचे सर्वेक्षण
शासनाच्या नियमानुसार महापालिकेने आता बल्क कचरा तयार करणाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, शहरातील २०० हून अधिक आस्थापनांत रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा तयार होतो. हे सर्वजण आपला कचरा घंटागाड्यांकडे देतात. आतापर्यंत महापालिका हा कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवीत होती. तर, बोटावर मोजण्याएवढे हॉटेल्स स्वतः कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मात्र, आता या सर्व आस्थापनांना कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक केले जाणार आहे. ज्यांच्याकडे अशी व्यवस्था नसेल, त्यांना पैसे मोजून महापालिकेला कचरा द्यावा लागणार आहे.












