कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका प्रशासनाने निवडणूक होताच पुन्हा थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (दि.१६) विविध झोन कार्यालयांतर्गत थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम राबविली. यात दोघांनी धनादेशाद्वारे थकीत कराचा भरणा केला. तर एक मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक विकास नवाळे यांनी दिली.
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी ३१ मार्चपूर्वी ५०० कोटींची कर वसुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील ११ महिन्यांत आयुक्तांनी विविध सवलत मोहीम राबवून २०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश मिळविले. ही आतापर्यंतची सर्वाधिक कर वसुली आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत २०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता विभाग व झोन कार्यालयातील अधिकारी कामाला लागले आहेत. झोन क्र.६ चे सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे, कर अधीक्षक रामदास गोपाळबरे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्र. ८९ मधील बजरंगनगरातील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील डी. एस. जाधव यांची मालमत्ता सील केली. त्यांच्याकडे २ लाख ६१ हजार ४७ रुपये कर थकला होता. या मोहिमेत पथकप्रमुख सतीश ढाकणे, रोख शोएब, जयपाल मोकळे, किरण थोरात यांची उपस्थिती होती.