शहर बसच्या लोकार्पणासाठी मनपाची लगीनघाई

Foto

औरंगाबाद- महानगरपालिकेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी शहर बससेवेचे लोकार्पण होणार आहे. बससेवेचा शुभारंभ आठ दिवसांवर आला, परंतु शहरात प्रवाशांच्या सेवेसाठी  उभारण्यात आलेल्या बसथांब्याची दुरावस्था झाली आहे. मात्र दुरवस्था झालेल्या बसथांब्याच्या रंगरंगोटी आणि दुरूस्तीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

शहरात सध्या एस.टी. महामंडळाकडून शहरबस सेवा सुरू आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून शहर बसेस चालविण्यात याव्यात.  महामंडळ बसेस चालविण्यास उत्सुक नाही, असे एस. टी. प्रशासनाने मनपास सांगितले. त्यानंतर जवळपास एक वर्षांपासून मनपा प्रशासनातर्फे शहर सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केले. मनपातर्फे 23 डिसेंबर रोजी शहर बससेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. सुरूवातील 25 बसेस शहरातील विविध मार्गावर धावणार आहेत. मनपा प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्याबाबत सध्या लगीनघाई सुरू आहे. परंतु सध्या शहरात असलेल्या बसथांब्याच्या दुरूस्तीकडे मात्र प्रशासनाने कानाडोळा केला आहे. शहागंज येथील बसस्थानकाचा तर मनपानेच कचरा डेपो केलेला आहे. बसस्थानकातील कॅबिनची इमारत मोडकळीस आलेली आहे.  या थांब्यात सध्या जुगार आणि दारूड्यांचा अड्डा झाला आहे. बसस्थानकासमोर फळभाज्याच्या गाड्या तसेच मॅटोडोअर व रिक्षांचा अनाधिकृत थांबा झाला आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बससेवा सुरू झाल्यानंतर बसेस वळविण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा राहिलेली नाही. तसेच काही थांब्याना भिकार्‍यांनी आपले  निवासस्थान केले आहे.  काही ठिकाणच्या थांब्यावरील पत्रे गंजत आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाकडे  गायब झाले आहेत. मनपा प्रशासनाने बससेवा सुरू करण्यापूर्वी बसथांब्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.