मनपा नगर रचना विभागाला २०१ कोटींचे उत्पन्न

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाला यंदा २०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्राच्या माध्यमातून १२४ कोटी रुपये, तर वर्षभरात ९ हजार २८४ मालमत्ताधारकांनी बेकायदा मालमत्ता गुंठेवारी कायद्यात नियमित करून घेतल्या. त्यातून ७४ कोटी रुपये महापालिकेला मिळाले.
आयुक्त जी. श्रीकांत यांनी महापालिका आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक विभागाला विक्रमी उत्पन्न करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यासंदर्भात मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, उत्पन्नवाढीला शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यामुळे हातभार लागला. रखडलेले अनेक मोठे प्रकल्प बांधकाम परवानगीसाठी आले. शहराच्या विकासाला बसलेली खीळ दूर झाली. शहरात औद्योगीकरण झपाट्याने होत आहे. त्यादृष्टीने मोठमोठे बांधकाम प्रकल्पही सुरू झाले आहेत. सहसंचालक मनोज गर्जे यांना सूचना देऊन गुंठेवारी आणि बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली. दरम्यान, ९ हजार २८४ फाइल्स गुंठेवारीअंतर्गत मंजूर केल्या. १३१४ जणांना बांधकाम परवानगी घेतली. ५०५ जणांना भोगवटा प्रमाणपत्र घेतले. यापूर्वी भोगवटा घेण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. सक्ती केल्याने बांधकाम व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक पुढे आले.