छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने धोकादायक इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वेक्षणात निष्पन्न झालेल्या शहरातील ४१ धोकादायक इमारतींपैकी सिटी चौक परिसरातील अत्तर गल्लीतील दोन जीर्ण इमारती बुधवारी (दि. ५) पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आल्या. एका इमारतीत मालक मुलासह वास्तव्यास असल्याने त्यांना सामानासह सुरक्षित बाहेर काढल्यानंतर मनपाने ही कारवाई पूर्ण केली. कारवाईदरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र महापालिकेने परिस्थिती नियंत्रणात आणत पाडकाम पूर्ण केले.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सविता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकाने ही मोहीम राबविली. यावेळी अत्तर गल्लीतील अमृत भाकरे व महमद सईद यांच्या संयुक्त मालकीची सुमारे ८० वर्षे जुनी तीन मजली इमारत मोडकळीस आल्याने ती धोकादायक ठरली होती. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून नोटिसा देऊनही इमारत हटविण्यात आली नव्हती. त्यामुळे बुधवारी महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने मालक व त्यांच्या मुलाला सामानासह बाहेर काढून इमारत जमीनदोस्त केली. यानंतर लगतच असलेली महमद सईद यांची जीर्ण इमारतही पाडण्यात आली. सागवान लाकडात उभारलेल्या या इमारतीतील लाकूड व मलबा स्वतः हटविण्याची तयारी मालकांनी दर्शविली. या कारवाईदरम्यान उपायुक्त नंदकिशोर भोम्बे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महापालिकेने शहरातील उर्वरित धोकादायक इमारतींवरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेत झोन-१च्या सहायक आयुक्त लता पुजारी, सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, अतिक्रमण हटाव पथक आणि नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












