मनपाची कर वसुली १०० कोटींच्या उंबरठ्यावर

Foto
सांजवार्ता
Date: 22/11/2026
१०० टक्के दंड माफी योजनेला ३ हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील ३ लाख २० हजार मालमत्ताधारकांपैकी ९५ हजार ३४० नागरिकांनी १ एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मालमत्ता कर भरला असून, त्यातून महानगरपालिकेच्या तिजोरीत ९८ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत. तसेच, थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या १०० टक्के दंड माफी योजनेचा आतापर्यंत ३ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे.
मनपा उपायुक्त विकास नवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा संकलन करणाऱ्या खासगी कंपनीच्या सर्वे क्षणात शहरात सुमारे ५.५० लाख मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. मात्र, मनपाच्या नोंदीनुसार ३ लाख २७ हजार ४३ मालमत्ता कर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मुरय प्रशासकीय इमारत
आकारणीच्या कक्षेत आहेत. यापैकी केवळ १ लाख ४० हजार मालमत्ताधारक
नियमित कर भरतात. उर्वरित थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मनपाने विशेष मोहीम सुरू केल्याने नोव्हेंबरमध्येच कर वसुलीचा आकडा १०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे.
पाणीपट्टी भरण्याकडे उदासीनता
शहरात १ लाख ४० हजार नोंदणीकृत नळ कनेक्शनधारक आहेत. मालमत्ता कराप्रमाणे पाणीपट्टी थकल्यास दंड आकारला जात नसल्याने नागरिक पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करतात. १ एप्रिल ते २० नोव्हेंबर दरम्यान केवळ २८ हजार ८०० नागरिकांनी पाणीपट्टी भरली असून, त्यातून मनपाला १३.१० कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान, ६ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या १०० टक्के दंड माफी योजनेतून गेल्या १५ दिवसांत ३ हजार ८५ थकबाकीदारांनी ४ कोटी ८६ लाख रुपयांचा कर भरला आहे. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंतच लागू राहणार आहे.
शनिवार, रविवारी झोन कार्यालय सुरू
महापालिकेने मालमत्ता करावरील शास्तीमाफीची सवलत योजना लागू केल्यामुळे नागरिकांना कर भरण्यासाठी शनिवारी आणि रविवारी झोन कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे. थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांनी झोन कार्यालयात जाऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त विकास नवाळे यांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.n Powered By: Vrudhee Solutions