नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केली सिल्लोड नगर परिषद कार्यालयात अचानक पाहणी

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी आज सकाळी ९.३० वाजता सिल्लोड नगर परिषद कार्यालयात अचानक पाहणी करून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

पाहणी दरम्यान काही अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याची गंभीर दखल घेत संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करावे, शिस्त राखावी आणि आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. 

यावेळी त्यांनी नगर परिषदेतील उपस्थितीबाबतचे नियमही स्पष्ट करत तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सकाळी ९. ३० वाजेपर्यंत, तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९. ४५ वाजेपर्यंत नियमानुसार कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. यापुढे या वेळापत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. संबंधितांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. 

नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांची कोणतीही कामे विनाकारण प्रलंबित राहता कामा नयेत. प्रत्येक नागरिकाला वेळेत, पारदर्शक सेवा मिळाली पाहिजे. कोणत्याही नागरिकाला आपल्या कामासाठी वारंवार नगर परिषद कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारण्यास भाग पाडणारी दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा उदासीनता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी दिला.


नागरिकांना वेळेत सेवा मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे. कामातील दिरंगाई व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. यासाठी अशा अचानक पाहण्या यापुढेही नियमितपणे सुरू राहतील. 

- अब्दुल समीर अ. सत्तार, नगराध्यक्ष