वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर शहरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी विशेष तपासणी मोहीम मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पथकाने ५० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले आहे.
आस्थापना, या मोहिमेदरम्यान विविध व्यावसायिक फळविक्रेते व हातविक्रेते यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ५० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले सिंगल यूज प्लास्टिक तात्काळ नष्ट करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या कारवाई दरम्यान स्वच्छता निरीक्षक पी. एस. पवार, मुकादम रमेश त्रिभुवन, प्रशांत इंगळे व पथकातील अक्षय व कोमल उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा व त्याऐवजी कापडी अथवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा तसेच स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त वैजापूर शहर घडविण्यासाठी नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नगर परिषदेमार्फत शहरातील सर्व नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांना करण्यात आले.
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, साठवणूक अथवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमित तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी बिघोत यांनी सांगितले.












