औरंगाबाद: शहर पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांत शहरात घडणार्या निर्घृण हत्या, चोर्या आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनात झालेली वाढ पाहता कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकसभेची निवडणूक नुकतीच संपली आहे. निवडणूक कामाने बंदोबस्तात पोलिस व्यस्त असल्याने शहरात चोर्या, घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. परंतु आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे बंदोबस्तातून पोलिसांची सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी अवघ्या काही तासांत मंगळसूत्र हिसकावण्याच्या तीन घटना घडल्या. यामुळे महिलांच्या सौभाग्याचे लेणे संकटात सापडले आहे. सध्या उन्हाळ्याच्या मुलांना सुट्या लागल्या आहेत. तसेच लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक आपली घरे बंद करून गावी जात आहेत.
या संधीचा फायदा घेत चोर घरे फोडून चोर्या करीत आहेत. मोठ्या मेहनतीने जमा केलेली जमापुंजी, दागिन्यावर चोरटे हात साफ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळी अवघ्या तासभरात मोटारसायकलवर बसून आलेल्या दोन चोरट्यांनी दहा तोळे सोने लंपास केल्याच्या घटना घडल्या. सध्या लग्न सराई सुरू आहे. अशा वेळी अनेक महिला सोन्याचे दागिने घालून लग्न सोहळ्याला हजेरी लावतात. अशा वेळी संधी साधून चोरटे महिलांच्या दागिन्यावर हात मारत आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच महिलांनी रस्त्याने जाताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तसेच गावी जाताना शेजार्यांना तसेच पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. चोर्या घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे किरकोळ कारणावरून खून होण्याच्या घटनाही वाढत आहे.
गत महिन्यात सिडकोतील एका संस्थाचालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडते न घडते तोच बुधवारी पैशाच्या देवाण- घेवाणीवरून वाद झाल्याने एका कंत्राटदाराने होमगार्डचा एका हॉटेलसमोर सर्व लोकांसमोर गळा चिरून हत्या केल्याची घटना किराडपुर्यात घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. यापूर्वीही काही ना काही कारणावरून खून करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून असे दिसून येते की, पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी, यासाठी आपल्या सर्व अधिकार्यांना विश्वासात घेऊन कडक धोरण राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.