नवी दिल्ली: मी पंतप्रधान होईन, असा विचारदेखील कधी केला नव्हता;पण परिस्थिती तशी निर्माण होत गेली. अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींनी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी मनमोकळेपणे सांगितल्या.
मोदी म्हणाले, राजकारणातही माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात.
लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात मिठाई वाटली असती. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो.
यावेळी मोदींच्या झोपेसंदर्भातही अक्षयने प्रश्न विचारला. तुम्ही रोज फक्त 3 ते 4 तास झोपता; पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले की, माझे ऐकले की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही? जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. 1962 चे युद्ध सुरू होते तेव्हा मी देशासाठी प्राण देण्याचे मनोमन ठरवून टाकले होते. तेव्हा वडिलांना मी सांगितले होते की, मला सैन्यात भरती व्हायचे आहे, त्या शाळेत टाका.
निवृत्तीनंतर मोदी काय करणार?
यावेळी अक्षयकुमारने निवृत्तीनंतर तुमचा प्लॅन काय असेल, असा प्रश्न मोदींना विचारला असता, ते म्हणाले, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन यांच्यासोबत एक बैठक होती. या बैठकीत सर्वांत कमी वयाचा मीच होतो. बैठक सुरू होण्यापूर्वी सगळे मिळून सहज गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सगळेजण आपापले विचार सांगत होते. मला विचारले तर मी म्हणालो, मला यातले काही जमतच नाही. मी कधी याबद्दल विचारच केला नाही. ज्या ज्या वेळी माझ्यावर जी काही जबाबदारी आली, त्यालाच मी आयुष्य मानलंय. स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी काही करावं लागेल याची मी कल्पनाच केली नाही. म्हणूनच माझ्या मनात कधी निवृत्तीविषयी विचार आला किंवा मी कधी त्याबद्दल विचारच करत नाही. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या चांगल्या कार्यातच घालवेन यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे मोदींनी सांगितले.
...म्हणून मी उलटे घड्याळ घालतो!
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. मी अनेकदा पाहिलेय की, तुम्ही घड्याळ उलटे घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते, असे का, असा प्रश्न अक्षयने विचारला असता, मोदी म्हणाले, मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मला लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहून घेतो.