मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खासदार पार्थ पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड बैठक पार पडली.
पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार आणि शरद पवार यांची बैठक सुरू झाली. ही बैठक जवळपास तीन तास म्हणजे रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. दोन राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या आजोबा-नातवामध्ये राजकीय मुद्यावर बैठक झाली असण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणाच्या अटी-शर्तींवर चर्चा?
या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या बैठकीने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याची आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन (विलीनीकरण) काम करणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री पार पडलेल्या या ३ तासांच्या बैठकीत विलीनीकरणाच्या संभाव्य अटी व शर्ती काय असाव्यात, यावर सविस्तर चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होऊन सत्तेत जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट मतदारसंघ आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत असल्याचे सांगण्यात आले.
सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. १७ ऑगस्टला ही रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलै २०२६ ला सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली होती, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना ९ जुलै २०२६ ला एक नोटीस पाठवण्यात आली होती, ९ जुलै २०२६ ला सुनेत्रा पवार यांची २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. २६ फेब्रुवारीची निवडणूक घटनाबाह्य आहे, या प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण नव्हते तसेच सचिदानंद सिंह आणि इतर राष्ट्रीय प्रतिनिधीना नामांकन भरणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी रिमायंडर नोटीस पाठवली आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.