जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी अभियानास प्रारंभ

Foto
जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी अभियानास प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो ) : चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाला बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४० हून अधिक नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.  त्यापैकी २० जणांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

 मोहिमेचा प्रारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या अभियानांतर्गत चाळीस वर्षांवरील व्यक्तींची नेत्र तपासणी व निदान केले जाणार असून, दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना मोफत चष्ट्यांचे वाटप, संदर्भ सेवा, नेत्रदान जनजागृती, नेत्रपेढीचा सहभाग तसेच इतर नेत्र आजारांबाबत उपचार व निदान सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अभियानाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. अर्चना भडीकर व नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संतोष काळे यांच्या हस्ते झाले.

या वेळी डॉ. रामटेके यांनी जिल्ह्यातील नेत्ररुग्णांचा शोध घेऊन अधिकाधिक रुग्णांना तपासणी व उपचार सेवेत सामावून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास डॉ. विभा भिवटे, डॉ. स्नेहल सूर्यवंशी, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रदीप पोळ, कोमल धोत्रे, वृषाली डोईफोडे, रश्मी चौधरी, सुनिता मस्के, आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. या विशेष अभियानामुळे जिल्ह्यातील नेत्ररुग्णांना मोफत तपासणी व उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे.