पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई ; प्रशासनासाठी ठरणार अग्निपरीक्षा ; बहुतांश नाल्यात मोठ्या प्रमाणावर साचला कचरा !

Foto

औरंगाबाद : नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी उरकून घेणे गरजेचे असताना, पावसाळा तोंडावर असतांना देखील नालेसफाईचे घोडे अजून अडलेले आहे. आज घडीला बहुतांश नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असल्याचे सांजवार्ता ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या तोंडावर होणारी नालेसफाई म्हणजे मनपा प्रशासना करिता अग्निपरीक्षा ठरणार आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक कामात दिरंगाई करणे ही जणू मनपा प्रशासनाची सवय झालेली आहे. उन्हाळा संपत असून पावसाळा तोंडावर आला आहे याचा अर्थ शहरातील नालेसफाई हे पावसाळ्यातच होणार आहे. शहरात नाल्यांची संख्या एकूण 98 असून, अनेक ठिकाणी नाल्यांवर जागोजागी अतिक्रमणे करून नागरीकांनी ती गिळंकृत केली आहे. अतिक्रमणांचा आकडा हा हजारोंच्या घरात आहे. परिणामी, पावसाच्या पाण्याला बाहेर पडण्यास जागाच मिळत नसल्याने वसाहतीत पाणी शिरते, औषधीभवन परिसर, जयभवानीगर, बायजीपुरा, संजयनगर, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, संभाजीपेठ, उल्कानगरी, कोकणवाडी या भागात नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.  वर्षभरापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी झाल्याने बहुतांश नाल्यांमध्ये मोठा प्रमाणावर कचरा टाकण्यात आल्याचे निदर्शनाला येते. परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी असल्याने या समस्येने डोके वर काढले नाही. आज घडीला देखील किल्लेअर्क, भवानीनगर, जुना मोंढा परिसर, जाफर गेट आदी भागात मोठ्या प्रमाणावर नाल्यांमध्ये कचरा पडलेला असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांश नाल्यात असल्याने उन्हाळा सुरू असतानाच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आत पावसाळ्यात ही कामे करणे म्हणजे प्रशासनासाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. असे असताना नालेसफाईच्या कामाकरिता प्रशासन निविदा काढणार असून, ही निविदा  1कोटी 68 लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासह साहित्य उपलब्ध करून देणे, वॉर्ड  कार्यालयांना या कामाकरिता  मनुष्यबळ पुरविण्यासाठी आगावू ३ लाखाची रक्कम देणे या नियोजनातच प्रशासन दंग असल्याचे दिसून येते.

गाळ टाकण्यासाठी जागाच नाही !

एकतर पावसाळ्याच्या प्रारंभी शहरातील नालेसफाई होत असून, त्यातही नाल्यातून काढण्यात आलेला गाळ टाकण्याकरिता प्रशासनाकडे जागाच उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे हा गाळ काढून टाकायचा कोठे असा प्रश्न उभा राहत आहे. हा गाळ काढून नाल्यांचा किनारी ठेवण्यात आला तर पावसाने हा पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.