नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी; कमल हसन यांचे वादग्रस्त वक्‍तव्य !

Foto

चेन्‍नर्ई: महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्‍कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे. कमल हसन यांच्या या वक्‍तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या अर्वाकुरची मतदारसंघात येत्या 19 तारखेला पोटनिवडणूक होत असून, मक्‍कल निधी मियाम या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केले.

  यावेळी कमल हसन म्हणाले, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे होते. त्याच्यापासून दहशतवाद सुरु झाला. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता. येथे मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे. मी महात्मा गांधींचा चाहता आहे. गांधीजींची हत्या झाली. त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी खरा भारतीय आहे आणि देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटते. माझाही तोच प्रयत्न आहे. कोणताही खरा भारतीय नेहमी देशाचा झेंडा म्हणून तिरंग्याला पसंती देतो आणि कायम देशाचा झेंडा तिरंगा राहील अशी त्याची इच्छा आहे, असेही हसन यांनी सांगितले.