राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उद्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर तसेच शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, शहरी व ग्रामीण भागात उद्या (दि. २८ जून) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. 
पोलिओचे दोन थेंब पोलिओमुक्त जीवनाची हमी : 
पोलिओ हा बालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेष बाब म्हणजे : 
खालील सर्व बालकांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या दिवशी पोलिओचा डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे
▶ नुकतेच जन्मलेले बालक
▶ आजारी असलेले बालक
▶ यापूर्वी अनेक वेळा पोलिओचे डोस घेतलेले बालक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोहिमेचे नियोजन
▶ एकूण लाभार्थी : २,८३,३७०
▶ पोलिओ बूथ: २,२४१
▶ सुपरवायझर : ५००
▶ होम व्हिजिट टीम : २,२३५
▶ होम व्हिजिट सुपरवायझर : ५३८
▶ मोबाईल टीम: ११३
▶ ट्रान्झिट टीम : ९३
पोलिओ बूथ दिवस
दिनांक २८ जून २०२६ (रविवार) वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सर्व पालकांना विनंती आहे की, जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागासोबत शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका स्तरावरील विविध विभाग तसेच पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांच्या सक्रिय सहभाग व सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे आवाहन केले आहे.