गंगापुरात नवरात्रोत्सवाची भव्य सुरुवात

Foto
दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी अंबाबाईला साकडे

गंगापूर, (प्रतिनिधी) : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे सावट दूर व्हावे, शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे, विहिरी व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा व्हावा. आणि बळीराजाच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदावी, यासाठी भाविकांनी आदिशक्ती अंबाबाईच्या चरणी साकडे घातले. 

भक्तिमय वातावरणात रविवारी गंगापूर शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. शहरातील मंदिरांसह विविध नवरात्रोत्सव मंडळे आणि अनेक घरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली.

शहरातील जिल्हा परिषद मैदानावर सार्वजनिक दुर्गामाता नवरात्रोत्सव समितीच्या वतीने सलग दहाव्या वर्षी भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष संजय पा. जाधव आणि समितीच्या अध्यक्षा सुवर्णा संजय जाधव यांच्या पुढाकारातून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी उत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे. रविवारी सायंकाळी जिल्हा परिषद मैदानावरील देवीच्या महापूजेला सुरुवात झाली.

 नगराध्यक्ष संजय जाधव व सुवर्णा जाधव यांनी कुटुंबीयांसह सकाळी घटस्थापना केली. व्यापारी रामेश्वर नावंदर व त्यांच्या पत्नीसमवेत नगराध्यक्ष संजय जाधव आणि सुवर्णा जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक सोपान देशमुख, योगेश पाटील, मुकुंद जोशी यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.

रविवारची सुटी असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. नगराध्यक्ष संजय जाधव व सुवर्णा जाधव यांच्या पुढाकारातून दहाव्या वर्षी उत्सवाचे आयोजन होत्या. अंबाबाई की जय, दुर्गामातेचा जयजयकारफ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत पाऊस चांगला पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.

-- कीर्तन आणि भागवत कथेतून भक्तिरसाची मेजवानी -- 
नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संदीप महाराज खंडागळे यांच्या घटस्थापना विशेष कीर्तनाने होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मध्य प्रदेशातील रेवा येथील ह.भ.प. सुश्री पलक किशोरीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज कथेनंतर भाविकांना फराळ महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
महिलांसाठी ङ्गहोम मिनिस्टर, पैठणीचा खेळ महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून १९ ऑक्टोबर रोजी क्रांतीनाना माळेगावकर प्रस्तुत ङ्गहोम मिनिस्टर चला खेळ खेळूया पैठणीचाफ हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर, द्वितीय पारितोषिक वॉशिंग मशीन, तृतीय पारितोषिक फ्रीज, तर चतुर्थ पारितोषिक म्हणून मिक्सर देण्यात येणार आहे.

-- विजयादशमीला भव्य शोभायात्रेने समारोप -- 
२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी भव्य शोभायात्रेने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. पारंपरिक वाद्यवृंद, आकर्षक सजावट, दुर्गामातेची मूर्ती आणि विविध सांस्कृतिक पथकांच्या सहभागामुळे शोभायात्रा विशेष आकर्षण ठरणार आहे.

यंदा पावसाअभावी ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, पिकांची स्थिती आणि आगामी हंगामाबाबत शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी अंबाबाईकडे दुष्काळाचे सावट दूर करण्याची आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्याची प्रार्थना केली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा जाधव यांनी केले आहे.