जय माता दी...
रेणुकामाता मंदिरात भक्ती, सेवा, सामाजिक बांधिलकीचा संगम
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे. पहाटेच्या सनई-चौघड्यापासून रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. पूजा-अर्चा, आरती, भजन, कीर्तन, देवीची आराधना, कुंकुमार्चन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांमुळे या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्तीबरोबरच सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंदिर शहरातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
रेणुका माता मंदिराची स्थापना १९८४ मध्ये झाली. मंदिरातील देवीचा तांदळा प.पू. अण्णा महाराज यांनी स्वतःच्या हाताने तयार करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून या देवस्थानाशी अनेक भाविकांची श्रद्धा जोडली गेली आहे. हे जागृत देवस्थान असल्याची अनेक भक्तांची भावना असून, नवरात्रोत्सवाच्या काळात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सतीश वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार २०११
धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
मध्ये नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मंदिराच्या विस्ताराला आणि विविध सोयीसुविधांच्या विकासाला गती मिळाली. मंदिराचा विकास करताना धार्मिक परंपरा जपण्यासोबतच भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरात पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता सनई-चौघड्याने दिवसाची सुरुवात होते. सकाळी साडेसात वाजता पूजा व आरती, दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती, तर सायंकाळी साडेसात वाजता महाआरती होते. या आरतींच्या वेळी शहरातील मान्यवर, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येते. आरतीच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. सकाळी नऊ वाजल्यापासून विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होतात. देवीची स्तोत्रे, सप्तशतीचे पाठ, कुंजिका स्तोत्र आणि कुंकुमार्चन असे धार्मिक विधी पार पडतात. दुपारी तीन ते पाच या वेळेत मान्यवर व राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तने, गोंधळ आणि जोगवा असे पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सायंकाळी आठ वाजता भारुड, शास्त्रीय नृत्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भक्तांना धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेता येतो. नवरात्रात अनेक महिला उपवास करतात, ही बाब लक्षात घेऊन मंदिराच्या वतीने दररोज दुपारी साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाते. यासाठी दररोज सुमारे दोन क्विंटल साबुदाणा खिचडी तयार केली जाते.











