पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये असून, एकदम ऐशो आरामात जगत आहे. वेस्ट एंड येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये सुमारे 75 कोटी रुपये किमतीच्या फ्लॅटमध्ये नीरव मोदी वास्तव्य करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नीरव मोदीला आम्ही शोधले असून, तो लंडनमध्ये वेस्ट एंड भागातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत आहे. नीरव मोदीचा व्हिडीओही या वृत्तासोबत प्रसारित करण्यात आला असून, अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेले दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र, नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतिक्रिया देतो.