रेल्वेरुळावरील वाटमारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष; निष्पाप प्रवाशांचे जाताहेत जीव

Foto


औरंगाबाद :  रेल्वेतून नव्हे तर आता धावत्या रेल्वेतून दरवाज्यात बसलेल्या प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाईल चोराचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर उस्मानपुरा रेल्वेगेट नंबर 53 बरोबर चिकलठाणा, संग्रामनगर उड्डाणपुल मुकुंदवाडी या रेल्वेपटरीवर चोरटे धावत्या रेल्वेतील प्रवाशांकडे लक्ष ठेवून बसत आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मोबाईल चोरांमुळे निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

रेल्वेमध्ये सर्वाधिक चोरीचे प्रमाण पाहिले तर मोबाईल चोरीचा आकडा सर्वाधिक आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानक ते चिकलठाणा रेल्वेस्थानक दरम्यान, चोर तळ ठोकून बसलेले असतात. धावत्या रेल्वेत दरवाज्यात बसलेल्या प्रवाशांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यात निष्पाप प्रवाशांचा जीव जात आहे. इतकेच नव्हे तर काही जण जखमीही होत आहे. नुकत्याच तपोवन एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरामुळे एका निष्पाप विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. यापूर्वी देखील अशाच मोबाईल चोरांमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावे लागले आहेत. 

यावर्षी १०२ चोर्‍यांची नोंद
यावर्षी जानेवारी ते मार्च अखेर रेल्वेत तब्बल १०२ चोर्‍या झाल्याची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक मोबाईल चोराचे  प्रमाण आहे. ७८ मोबाईल चोरट्याने आतापर्यंत यावर्षी पळविले आहे. मात्र त्यापैकी काहींचाच शोध लागलेला  आहे. १०२ चोर्‍यांपैकी केवळ २७ चोर सापडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिस क्राईम रायटर माणिक आचार्य यांनी दै. सांजवार्ताशी बोलताना दिली.

अनेकांचे जीव तर गेले
धावत्या रेल्वेत दरवाज्यात बसून प्रवाशांनी प्रवास करू नये, अशा वारंवार रेल्वे विभागाकडूवन सूचना दिल्या जातात. परंतु सूचनांचे पालन केले जात नाही. याचा फायदा चोरटे घेत आहे. दरवाज्यात बसून, असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरणे तसेच मोबाईल हिसकावणे यासारख्या प्रकारामुळे अनेकांचे जीव जात आहे. चोरटे मोबाईल चोरून पळ काढतात. परंतु अनेकांचे जीव तर गेले आहेत ना? याकडे रेल्वेप्रशासन, रेल्वे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणीही आता प्रवासी करताना दिसत आहे. 

सातारा रेल्वेगेट चोरट्यांचा अड्डा
सातारा रेल्वेगेटजवळील छोटा मुरलीधरनगर, मिलिंदनगर येथील १२ ते १८ वर्षे  वयोगटातील भुरटे चोर रेल्वे येण्याच्या वेळेत रेल्वे पटरीजवळ उभे राहून आपले सावज हेरण्याच्या प्रयत्नात असतात. यापूर्वीही या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे आणि स्थानिक पोलिसांनी या भागातील चोरट्यांना शोधून कार्यवाही करावी.