जेरुसलेम/वॉशिंग्टन: इस्रायल-इराण युद्धाच्या भीषण परिस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांनी आता टोकाचे वळण घेतले आहे. नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या व्हायरल होत असतानाच, त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला. मात्र, या व्हिडिओमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केल्याने हा व्हिडिओ एआय निर्मित नकली व्हिडिओ असल्याचे दावे करण्यात आले. यानंतर इस्रायलने आज पुन्हा एक व्हिडीओ जारी करत नेतन्याहू जिवंत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमका वाद काय?
गेल्या दोन दिवसांपासून नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इराण समर्थक सोशल मीडिया हँडलवरून केला जात होता. या अफवा शांत करण्यासाठी नेतन्याहू यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओच्या एका विशिष्ट फ्रेममध्ये नेतन्याहू यांच्या ओठांची हालचाल आणि आजुबाजुच्या गोष्टी, कपमधील कॉफीचा जास्तीचा स्तर आदी बनावट असल्याचा दावा 'Frame-by-Frame' विश्लेषण करणाऱ्या युजर्सनी केला आहे.
Grok AI चा खळबळजनक दावा
या वादात खरी ठिणगी पडली ती एलॉन मस्क यांच्या Grok AI चॅटबॉटमुळे. जेव्हा युजर्सनी Grok ला या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल विचारले, तेव्हा या एआय चॅटबॉटने स्पष्टपणे म्हटले की, "हा व्हिडिओ १००% डीपफेक आहे." ग्रोकच्या मते, व्हिडिओमधील लिप-सिंक, कॉफीचे स्थिर लेव्हल आणि नेतन्याहू यांचा कॅज्युअल लूक हे सर्व एआयने तयार केल्याचे संकेत आहेत.
इस्रायलचे स्पष्टीकरण
पंतप्रधान कार्यालयाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "पंतप्रधान पूर्णपणे सुखरूप असून ते युद्ध परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. व्हायरल होणाऱ्या बातम्या निव्वळ 'फेक न्यूज' आहेत," असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तरीही, नेतन्याहू सार्वजनिकरीत्या समोर न आल्याने आणि आधीच्या व्हिडीओतील 'सहा बोटांच्या' तांत्रिक चुकीमुळे जगभरात संभ्रम कायम आहे.