काल संध्याकाळी पडलेल्या पावसाने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी
साचले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटकरी मात्र या
रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत रस्त्यावर पाझर तलाव निर्माण करून
दिल्याबद्दल आभार आता होडी अथवा बोटीचीही व्यवस्था करावी, असे म्हणत मनपा
प्रशासनाची चांगलीच टर उडताना दिसतात.
शहरातील रस्ते म्हणजे
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काहीच बोध होत नाही. त्यातही नव्या
वसाहतीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. हर्सूल वार्ड क्रमांक 2
मधील भगतसिंग नगरकडे जाणार्या एकमेव रस्त्यावर सध्या पाण्याचे मोठे तळे
साचले आहे. जवळपास दहा वसाहतींना जोडणारा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.
पावसाचे पाणीच पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना चालणेही अवघड बनले. तर
वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नेटकरी उडवताहेत टर !
दरम्यान
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे नेटकरांनी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले
आहेत. यावर अनेकांनी मनपाच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
महानगरपालिकेने रस्त्यावर पाझर तलाव निर्माण केल्याबद्दल धन्यवाद अशी
टिप्पणी करीत मनपाच्या विकासकामांची चांगलीच टर उडवली आहे.













