सेने पाठोपाठ एमआयएमचेही भावनिक राजकारण
तब्बल दोन दशके जातीय दंगलीत होरपळणार्या शहराला सुधारणावाद आणि नव्या युगाचे नेते मिळावेत म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. उच्चशिक्षित तरुणाईला दिशा देणारे नेतृत्व मिळेल, यासाठी सर्वच समाज घटकांनी इम्तियाज जलील यांच्या पारड्यात मत टाकले. दुर्दैवाने नवे पीकही जुन्याच रोगाने ग्रासलेले निघाल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला, यात शंका नाही.
वीस वर्ष खासदारकी भोगणार्या चंद्रकांत खैरे यांनी हिंदू-मुस्लीम शिवाय केले काय ? असा सवाल करीत गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन तरण्याबांड नेत्यांनी आव्हान दिले. पत्रकारितेची पार्श्वभूमी आश्वासक चेहरा, उत्कृष्ट भाषण शैली असलेल्या इम्तियाज जलील यांनी जनमानसावर छाप सोडली. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे चेहरा बनलेले हर्षवर्धन जाधव यांनीही बोचरी टीका करीत थेट खैरेंच्या शिक्षणावर हल्लाबोल केला. शहरातील प्रमुख मार्गावर तर जलील आणि जाधव यांनी आपल्या उच्च शिक्षणाचे पुरावे म्हणून इंग्रजीत लिहिलेले मोठे बोर्ड लावले.
लॉक डाऊनच्या काळात थंड बस्त्यात गेलेले राजकारण आता उफाळून आले आहे. सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा वाद गाजतो आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊ नये झालेले नाही. या क्षेत्रात प्रचंड अडचणीचा डोंगर आहे. बेरोजगार तरुणांच्या नोकर्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे.
जलील यांचा पाय खोलात!
सर्व जाती-धर्माचा मी खासदार आहे, अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण करणार्या खासदार जलील यांचा या दोन्ही आंदोलनाने एक पाय खोलात गेला आहे. हिंदू मतपेढीला चुचकरण्याच्या नादात समर्थकांची नाराजी जलील यांनी ओढवली. त्यांच्यात पक्षात आता टीकेचे सूर उमटत आहेत. दुसरीकडे शिवसेनेला आयता मुद्दा देत पुन्हा ऊर्जा देण्याचे काम या निमित्ताने जलील यांनी केले. त्यामुळे एमआयएम शिवसेनेची छुपी युती तर नाही ना ? अशी शंकेची पालही मतदारांच्या मनात पुटपुटली आहे. शहराला हिंदू-मुस्लीम वादा पासून मुक्ती हवी म्हणूनच नव्या उमेदीच्या मतदारांनी मतदान केले होते. मात्र नवे पीकही मंदिर- मशीद राजकारण करणारेच निघाले, त्यामुळे आता शहरवासीयांची घोर निराशा झाली यात शंका नाही.