नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता आखाती देशांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने कतार आणि जॉर्डनसह दुबईमध्येही हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारतात येणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली असून दुबईतील सर्व विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत.
इस्रायल-इराण युद्धामुळे मध्य प्रदेशातील अनेक प्रवासी शारजाहमध्ये अडकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंदूरमधील रहिवाशांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. शारजाहून इंदूरला येणारे 'एअर इंडिया एक्सप्रेस'ची फ्लाईट कॅन्सल करण्यात आली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील १०० हून अधिक प्रवासी दुबई आणि शारजाह विमानतळावर अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवासी इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील आहेत.
जीतू पटवारी यांचं पंतप्रधान मोदींना आवाहन
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवाहन केलं आहे. "इस्रायल-इराण युद्धाच्या परिस्थितीमुळे दुबई आणि शारजाह विमानतळावर मध्य प्रदेशातील १०० हून अधिक नागरिक अडकले आहेत. महिला, मुलं आणि त्यांचे कुटुंबीय अनेक तासांपासून गैरसोयीचा सामना करत असून फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सर्व भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करावी आणि त्यांना लवकरात लवकर स्वदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी" असं जीतू पटवारी यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी गेलेले इंदूरचे भाजपा नेते आणि माजी आमदार संजय शुक्ला हे देखील तिथे अडकले आहेत. संजय शुक्ला यांच्यासोबत अनेक मोठे नेते, उद्योगपती असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने सर्व नागरिक सुरक्षित असून तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र फ्लाईट कॅन्सल झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण आहे.
इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसवी यांचा हल्ल्यात मृत्यू
इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसवी यांचा हल्ल्यात मृत्यू, मौसवी यांच्यासोबतच इराणच्या संरक्षण यंत्रणेतील ७ बडे सदस्य आणि ४० कमांडर्सचा मृत्यू, इस्राइली डिफेन्स फोर्सने दिली माहिती