निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप, मतीन यांच्या नगरसेवक पदावर कारवाई

Foto
छत्रपती संभाजीनगर  : नाशिक येथील बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली असून, तिच्या अटकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचा मास्टरमाईंड माजी खासदार इम्तियाज जलील हे असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही पेड वर्कर होती. एमआयएमच्या नगरसेवकाने तिला आसरा दिला. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता जे घर तिला दिलं, तेही अनधिकृत आहे. त्यावरही आज उद्यामध्ये कारवाई होईल. मात्र मास्टरमाइंड इम्तियाज जलील आहे, असा दावा त्यांनी केला आहे
निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक
शिरसाट यांनी निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंधावर थेट बोट ठेवले आहे. निदा खान ही इम्तियाज जलीलचा भावाच्या पत्नीची नातेवाईक आहे. त्यामुळेच जलील यांचा थेट संबंध आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. तर, मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची माहिती देखील त्यांनी दिलीय. आता या आरोपावर इम्तियाज जलील काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती
दरम्यान निदा खानला पोलिसांनी मतीन पटेल यांच्या फ्लॅटमधून अटक केल्यापासून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांना मोठा दणका दिला आहे, त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधले आहे. त्या घराला महापालिकेने नोटीस दिली असून त्यांच्या घरावर देखील महापालिकेने नोटीस चिटकवली आहे. परिणामी ३ दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरे राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसलाही अतिक्रमणाचा नोटीस बजावण्यात आली आहे, त्याचबरोबर त्यांचे नगरसेवक पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला पोलिसांच्या पासून लपवणे महागात पडण्याची शक्यता आहे. कारण अनधिकृत  बांधकाम करणे भोवणार आहे. त्याचबरोबर मतीन यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच महापौर समीर राजूरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पालिका कायदा १०- १ ड नुसार कारवाई होऊ शकते, असं महापौरांनी सांगितलं आहे. तर महापौरांच्या या वक्तव्यावरती महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते समीर बिल्डर यांनी म्हटलं की, मतीन पटेल यांना नगरसेवक हे महापौर यांनी बनवलं नाही तर नारेगावच्या जनतेने बनवलं आहे. त्यामुळे महापौर हे कोणाचं नगरसेवक पद रद्द करू शकत नाहीत .घराला नोटीस दिली आहे त्यावर कायदा आहे आम्ही कोर्टात जावू.

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल कोण?
मतीन पटेल हे संभाजीनगरमधील प्लॉटिंग व्यवसायिक असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एमआयएम पक्षात सक्रिय आहे. ते इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीत एमआयएमने प्रभाग क्रमांक ९ मधून मतीन पटेल आणि त्याच्या बहिणीला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मतीन पटेल यांनी कलीम कुरेशी यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर मतीन आणि त्यांची बहीण दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले होते. तसेच मनपा निवडणुकीदरम्यानही त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते.

नगरसेवकाचा तो फ्लॅट अन् निदाचा मुक्काम
 नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ४० दिवसांपासून फरार होती, पोलिसांची अनेक पथकं तिचा शोध घेत होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे () नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या ५ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.