नवी दिल्ली- आमदार आणि खासदारांच्या सुमार कामगिरीची जबाबदारी ही पक्षाध्यक्षांचीच असते, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी थेट भाजप नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गडकरींचा रोख भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिशेनेच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही
दिवसांपासून नितीन गडकरी हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दिल्ली येथे
गुप्तचर विभागाने (आयबी) एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान
परिसंवादात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जर मी पक्षाध्यक्ष असतो आणि माझ्या पक्षाचे आमदार, खासदार चांगली
कामे करत नसतील तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? तर ती माझी राहील. माणसाने विनम्र असावे आणि नाती जपावी.
तुम्ही उत्तम वक्ते आहात;पण यामुळे निवडणुकीत विजय मिळत नाही. तुम्ही विद्वान असालही;परंतु म्हणून लोक
तुम्हाला मत देतीलच असे नाही. थोडा विचार केला तर आपल्याला आपली चूक लक्षात येते.
आत्मविश्वास आणि अहंकार यात हाच फरक असतो. आत्मविश्वास हवा;पण अहंकाराला दूर
ठेवा, असे गडकरी यावेळी
म्हणाले.
गडकरींच्या या
वक्तव्याचा रोख भाजप अध्यक्ष अमित शहांकडे असल्याचे तर्कवितर्क आता लावले जात
आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या झालेल्या दारुण
पराभवाच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या या वक्तव्याला धार आली आहे. निवडणुकीतील
विजय आणि पराभवाची जबाबदारी ही पक्षाच्या नेतृत्त्वाने स्वीकारली पाहिजे, असे वक्तव्य
गडकरी यांनी रविवारी पुणे येथील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्याची चर्चा
सुरू होताच गडकरींनी नंतर सारवासारव केली आणि आपले वक्तव्य मोडतोड करून मीडियाने
समोर मांडले, असे सांगत
मीडियावर खापर फोडले.