नवी दिल्ली : देशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सरकार अशा कुठल्याही प्रस्तावाच्या विचाराधीन नाही, असं पुरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केलं आहे.
मोदी सरकारसमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे भारतातील नागरिकांसाठी इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ करणं; किंवा भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेच्या झळांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या आर्थिक स्थितीवर ताण सहन करणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्ष सुरु झाल्यापासूनच्या गेल्या चार वर्षांतील आपल्या सरकारची वचनबद्धता कायम राखत, भारतीय नागरिकांचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःच्या आर्थिक स्थितीवर ताण सहन करण्याचा निर्णय घेतला, असे हरदीप पुरींनी स्पष्ट केले.
अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाव्यत्यय
जागतिक परिस्थिती अद्यापही अनिश्चित आहे; त्यामुळे ऊर्जा, पुरवठा साखळ्या आणि अत्यावश्यक वस्तूंच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देशांतर्गत इंधन, ऊर्जा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना अविरत सुरु राहील, याची सरकार खात्री बाळगत आहे. कोणत्याही संभाव्य आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताने यापूर्वीही आपला खंबीरपणा सिद्ध केला आहे; आणि यापुढेही आम्ही वेळेवर, सक्रिय आणि समन्वित उपाययोजना राबवणे सुरुच ठेवू, असंही पुरी म्हणाले.
लॉकडाऊन लागण्याच्या अफवा निराधार
लॉकडाऊनबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. मला हे स्पष्ट करायचं आहे की, सध्या सरकारी पातळीवर अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार सुरु नाही. अशा नाजूक प्रसंगी, आपण सर्वांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, अफवा पसरवणे आणि अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण करणे हे बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक कृत्य आहे, असं हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं आहे.