नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या खंडपीठावर कागद फेकणार्या आणि शिवीगाळ करणार्या याचिकाकर्त्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी घेतला आहे. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर एका याचिकाकर्त्याने हे कृत्य केले. त्यानंतर सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयाबाहेर नेले. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असला, तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारवाई का होणार नाही?
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातला. त्याने न्यायालयात अपमानास्पद भाषा वापरली आणि खटल्याच्या फाईलचे कागद न्यायालयात भिरकावले. याप्रकारानंतर त्याला कोर्टाबाहेर नेण्यात आले. या प्रकरणात त्या व्यक्तीवर काय कारवाई केली जाते, याकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे. पण त्या व्यक्तीवर कुठलीही कारवाई करू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाचा असा विश्वास आहे की, अशा घटना क्षुल्लक प्रसिद्धी मिळवण्यासाठी घडवल्या जातात. अशा प्रकरणात कारवाई केल्यास त्या व्यक्तीचा हेतू साध्य होईल. जेव्हा रजिस्ट्रारने सरन्यायाधीशांना या घटनेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांनी या प्रकरणात पुढील कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले.
नेमका काय घडला प्रकार?
सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हा प्रकार घडला, त्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायालयात उपस्थित नव्हते. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि आलोक आराधे यांचे खंडपीठ याचिकेवर सुनावणी करत होते. तसेच याचिकाकर्ता वकिलाशिवाय स्वतःच आपली बाजू मांडत होता. या सुनावणीदरम्यान, त्याने स्वतःला सार्वभौम घोषित केले आणि केस फाईलमधील कागदपत्रे हवेत फेकली. या वर्तनामुळे न्यायालयात क्षणभर शांतता पसरली आणि सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला तात्काळ बाहेर काढले.
न्यायमूर्तींनाच आदेश द्यायला लागला याचिकाकर्ता
सुनावणी सुरू होताच, याचिकाकर्ता म्हणाला, माय लॉर्ड, मी तुम्हाला लखनौच्या एसीपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश देतो. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि विचारले, तुम्ही मला आदेश देत आहात का? याचिकाकर्त्याने उत्तर दिले, माझ्या बाजूने एवढेच; सर्व काही रेकॉर्डवर आहे. त्यानंतर त्याने केस फाईल हवेत फेकली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरक्षा कर्मचार्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि त्याला न्यायालयाबाहेर काढले. मात्र त्याच्यावर पुढे काहीही कारवाई केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.