दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय !! आता जंतर मंतरवर कुणालाच आंदोलन करता येणार नाही

Foto
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध आंदोलनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जंतर-मंतरची 'अधिकृत आंदोलन स्थळ' म्हणून असणारी मान्यता दिल्लीपोलिसांकडून रद्द करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून, जंतर-मंतरवर आता कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना किंवा निदर्शनांना परवानगी दिली जाणार नाही. 

या निर्णयामुळे राजधानी दिल्लीतील आंदोलनांच्या संस्कृतीत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतरची मान्यता रद्द केल्यानंतर आता निदर्शने आणि आंदोलनांसाठी नव्या पर्यायी जागांचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे आंदोलकांना आपले मागण्या मांडण्यासाठी नवीन आणि निश्चित केलेल्या ठिकाणीच एकत्र यावे लागेल. सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताण कमी करणे आणि ल्युटियन्स दिल्ली परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हा या नव्या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

नवे पर्याय कोणते? 

जंतर-मंतरची अधिकृत आंदोलनाची जागा रद्द झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार (L&O/48/2026) सार्वजनिक सभा आणि आंदोलनांसाठी तीन नवीन पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मध्य दिल्लीतील 'रामलीला मैदान' ५०,००0 लोकांच्या मध्यम आकाराच्या जमावासाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच, मोठ्या रॅली आणि जनसमुदायासाठी उत्तर दिल्लीतील 'बुराडी मैदान' आणि पूर्व दिल्लीतील 'सीबीजी ग्राउंड'  या नव्या जागांची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन व्यवस्थेमुळे राजधानीतील वाहतूक सुरळीत राहण्यास आणि आंदोलनांचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.

जंतर मंतर वर झाली अनेक आंदोलने
गेल्या अनेक दशकांपासून जंतर-मंतर हे देशव्यापी आंदोलनांचे, उपोषणांचे आणि सामाजिक-राजकीय निदर्शनांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो वा कुस्तीपटूंचे आंदोलन, अनेक ऐतिहासिक आंदोलनांचा साक्षीदार जंतर-मंतर परिसर राहिला आहे. मात्र, ल्युटियन्स दिल्लीच्या या अत्यंत संवेदनशील भागात सातत्याने होणाऱ्या आंदोलनांमुळे वाहतुकीची कोंडी, सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दिल्ली प्रशासनाने जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे आगामी काळात राजकीय पक्ष, विविध संघटना आणि आंदोलकांना आपल्या आंदोलनांची रणनीती बदलावी लागणार आहे.

आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल  :  अभिजित दिपके 
दिल्लीतील आंदोलनांचे केंद्र मानले जाणारे जंतर मंतर हे मैदान गेल्या काही महिन्यांपासून देशातील राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, दिल्लीपोलिसांनी दिल्लीतील आंदोलन करण्याच्या ठिकाणांच्या यादीत फेरबदल करत जंतर मंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे जंतर मंतरवरून आंदोलने करता येणार नाहीत. या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल, असा इशारा सरकारला दिला आहे. दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अभिजित दिपके म्हणाले की, आता जंतर मंतर हे आंदोलनस्थळ राहिलेले नाही. भेकड हुकूमशहांनी जंतर मंतरला युद्धाच्या मैदानात परिवर्तित  केले होते. आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा कारणांचा हवाला देत जंतर मंतरला राजधानीतील आंदोलनस्थळांच्या यादीतून हटवले आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने आंदोलनासाठी तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राऊंडचा समावेश आहे.