लातूर : राज्यातील अनेक भागांवर दुष्काळाचे सावट गडद होत असताना सरकारने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून उपाययोजनांना वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकर्यांशी थेट संवाद साधला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत यंदा सुमारे ५० टक्केच पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीनसह खरीप पिके हातातून गेल्याची स्थिती असून, शेतकर्यांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी लातूरमध्ये दिली. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतकर्यांना आर्थिक मदत यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जाहीर केलेली कर्जमाफीची प्रक्रिया थांबवली जाणार नसून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना शनिवारपूर्वी काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या भागातून दुष्काळाची माहिती प्राप्त झाली आहे, त्या भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, पुढील माहितीच्या आधारे इतर भागांचाही समावेश केला जाईल. केंद्राकडून एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मागण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असला तरी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत सुरू ठेवली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला असून ते अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत. मंत्र्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि गावागावांत जनता दरबार घ्यावा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, लातूर दौर्यात फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दीर्घकालीन दुष्काळमुक्तीसाठी डिसेंबरपर्यंत डीपीआर तयार होईल आणि त्यासाठी जागतिक बँकेशी चर्चा सुरू असल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्री समोर येताच शेतकर्याला अश्रू अनावर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ढसाढसा रडला शेतकरी..
लातूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ दौर्यावर आहेत. लातूर जिल्हात देवेंद्र फडणवीस दुष्काळाची पाहणी करत आहेत. थेट ते बांधावर पोहोचले आहेत. शेतकर्यांसोबत संवाद साधत आहेत. परिस्थिती किती जास्त गंभीर आहे, हे सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. शेतकर्यांसोबत शेतीची पाहणी फडणवीस यांच्याकडून केली जात आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी राजा चिंतेत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस लातूर जिल्हयातील पिकांची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पाहून शेतकर्याचा अश्रूचा बांध फुटला. मुख्यमंत्र्यासमोर शेतकरी रडताना दिसला. मुख्यमंत्र्याने शेतकर्याला आपल्या गळ्याला लावले. यावेळी सर्वजण भावूक झाले. यावेळी महिला देखील मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमचे भाऊ आहे, म्हणताना दिसल्या. परिस्थिती गंभीर आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये फक्त ५० टक्के पाऊस झाल्याचे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केले आहे. शेतकर्यांच्या मागे सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले.