मुंबई : काल आणि आज दोन्हीही राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाच्या चर्चेला विराम देताना आज राष्ट्रवादी शरद पवारच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतेही विलीनीकरण होणार नाही आणि आम्ही सत्तेतही जाणार नाही , अशी स्पष्टोक्ती करून हा विषय आम्ही संपवत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर जाऊन अमित शाह यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने चर्चा करून आपल्या कार्यकर्त्यांना जोरदार आयोजनाच्या सूचना दिल्या. यावरुन दोन्ही राष्ट्रवादींच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. गाठीभेटी, चर्चा, बैठका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे, वक्तव्ये करण्यात येत होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आणि एनडीएसोबत सत्तेत जाण्याच्या चर्चांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे भाष्य केलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, एनडीए सोबत जाण्याची चर्चा नाही. जिथे चर्चा नाही तिथ कॉमा, फुलस्टॉप विषय येत नाही. एसए लिहिला नाही तर त्याबाबत का बोलायचं? अशा शब्दात विलीनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लावला आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विलीनीकरणाच्या चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप झाला, ज्या दिवशी संघटनेतील पदाधिकारी आणि माझा अजितदादा यांच्याशी चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ पण तुम्ही दाखवले. माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती. ज्या दिवशी भाऊ गेला त्या दिवशी विलीनीकरणाला फुल स्टॉप झाला. आमच्याकडून एकही स्टेटमेंटनंतर केलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे स्टेटमेंट आली त्याला आम्ही काऊंटर केलेलं नाही. जे आमचं पुढे जायचं ठरलं होतं, ते अजितदादांसोबत ठरलं होतं. काही गोष्टी हृदयातूनही होतात, विलीनीकरणाच्या चर्चांवर आज जे काही आहे ते प्रश्न विचारुन टाका, आज काय ते होऊन जाऊ द्या. यापुढे मी विलिनिकरणावर बोलणार नाही. या चर्चांवरुन मला कंटाळा आला आहे, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत होण्याचा विषयचं येत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार गटातून कुणाचाही प्रस्ताव आलेला नाही, फोन, मेसेज काहीही आलेलं नाही. माझा भाऊ गेला त्यावेळी सगळा विषय संपला आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही
त्याचबरोबर माझा भाऊ गेला त्यानंतर या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम दिलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियांवर काहीही बोलत नाही. माझं आणि माझ्या भावाचं नात जवळच होतं तो ओलावा कायम राहील असंही सुळेंनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर जाऊन अमित शाह यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने चर्चा करून आपल्या कार्यकर्त्यांना जोरदार आयोजनाच्या सूचना दिल्या. यावरुन दोन्ही राष्ट्रवादींच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) दोन गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्यानंतर, आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोमवारी शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी पुण्यात येणार असून, ते दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाचे (पुतळ्याचे) अनावरण करणार आहेत. पुणे जिल्हा परिषद आवारात अमित शहा यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या सूचना दिल्या. तसेच, त्यांनी पुणे परिसरातील आमदारांची भेट घेऊन या नियोजनाबाबत चर्चा केली.