सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही, गीतांजली सोनम यांची हायकोर्टात धाव

Foto
 नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सफदरजंग रुग्णालयावर आपला विश्वास नसल्याचं सांगत त्यांनी वांगचुक यांना तातडीने दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच उपचाराच्या नावाखाली त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गीतांजली यांनी सोनम वांगचुक जंतर-मंतरवर आपल्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी होते, तेव्हा त्यांना जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात त्यांना त्यांचं कुटुंब, वकील आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांपासूनही वेगळं ठेवण्यात आलं आहे असं म्हटलं आहे.

सोनम वांगचुक यांना सध्या अशा प्रकारे ताब्यात ठेवणं असंवैधानिक असून ते कलम १९ आणि २१ चं उल्लंघन आहे, असं घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत न्यायालयाकडे करण्यात आली आहे. तसेच त्यांना रुग्णालयातून तात्काळ सोडण्यात यावं किंवा कुटुंबाच्या पसंतीच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असंही म्हटलं आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
गीतांजली आंग्मो यांनी सोशल मीडियावरही रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाने कुटुंबाला माहिती दिली होती की, वांगचुक यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली आली आहे, जी जीवघेणी मानली जाते. परंतु, सार्वजनिक हेल्थ बुलेटिनमध्ये हा आकडा लपवून फक्त पोटॅशियमची पातळी कमी होत आहे असं लिहिण्यात आल्याचं गीतांजली यांनी म्हटलं. 

थ्री फेज प्लॅन, ग्रीन कॉरिडोअर, साध्या वेशातील पोलीस... सोनम वांगचुक यांना मंचावरुन कसं नेलं?
सोनम वांगचुक यांच्या पत्नीने दावा केला की, कित्येक तास मागणी केल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबाला एका स्वतंत्र लॅबमध्ये रक्ताचे नमुने तपासण्याची परवानगी मिळाली. तिथे आलेल्या रिपोर्टमध्ये पोटॅशियमची पातळी ३.५ आली, जी सामान्य मानली जाते. याच आधारावर त्यांनी रुग्णालयाच्या मेडिकल रिपोर्ट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सोनम वांगचुक यांना रुग्णालय डिस्चार्ज देत नाही
कुटुंबाने वारंवार मागणी करूनही रुग्णालय प्रशासन वांगचुक यांना डिस्चार्ज देत नाही आणि कोणत्याही खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगीही देत नाही, असा आरोप गीतांजली यांनी केला आहे. रुग्णालयाच्या मजल्यावर ३० पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालयात १०० हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत, ज्यामुळे कुटुंबाच्या येण्या-जाण्यावरही मर्यादा आल्या आहेत.

हे उपचार नाहीत, तर बेकायदेशीर अटक
हे उपचार नाहीत, तर बेकायदेशीर अटक आहे. जर सोनम वांगचुक यांना काहीही झाले, तर त्याची पूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल असं गीतांजली यांनी म्हटलं. तसेच आता या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातच राहणार की त्यांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याची परवानगी मिळणार, हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.