वैजापुरात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. या पावसामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली. किरकोळ स्वरूपातील वादळ व पावसानेच विज कंपनीचे पितळ उघडे पडले.

जवळपास पाच तास शहर व परिसरातील विजपुरवठा खंडीत झाला. वैजापूर शहरानजीक रोटेगाव पासून ते जानेफळ पर्यंत पावसाच्या सरी कोसळल्या. खंडाळा, लोणी, सवंदगाव या परीसरात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे हाल झाले. काढणीस आलेला कांदा, गहु, हरभरा व मका पिकाचे पावसाने नुकसान होणार आहे. 

काढुन ठेवलेले मका. कांदा व गहु पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. पावसाचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर खर्च करुन ताडपत्री खरेदी करावी लागली. तर गहु काढणाऱ्या हार्वेस्टर चालक व मालकांनी दर वाढवल्याने शेतकऱ्यांना झळ सोसावी लागली. 

रात्री उशीरा पर्यंत शहरातील विज पुरवठा खंडित झाला होता. उच्च वाहीनीच्या वीज कंपनीच्या वैजापूर फिडर जवळील तारांवर झाड कोसळल्याने विज पुरवठा खंडीत झाल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले.