छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : न्यायालयीन प्रक्रियेवर अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.सी. मोरे व न्या. वैशाली जाधव-पाटील यांनी दिले.
याप्रकरणी अॅड. अमित देशपांडे यांनी अॅड. शैलेंद्र गंगाखेडकर यांच्यामार्फत फौजदारी अवमान याचिका दाखल केली. याचिकेनुसार, खासदार राऊत यांनी सर्वो च्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि एकूणच न्यायव्यवस्थेविषयी विविध माध्यमांवर अनेकदा अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. याप्रकरणी राऊत आणि इतरांविरोधात न्यायालयाच्या
अवमानाची याचिका दाखल करण्यासाठी राज्याच्या तत्कालीन महाधिवक्त्यांकडे कायद्यान्वये संमती मागितली होती. या वक्तव्याची दखल घेऊन राज्याचे विद्यमान महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी अॅड. देशपांडे यांना फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यास परवानगी दिली. त्या अनुषंगाने अॅड. देशपांडे यांनी अॅड. गंगाखेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका दाखल केली. राऊत यांनी केलेली अवमानकारक विधाने प्रसिद्ध करणाऱ्या काही प्रसारमाध्यमांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions













