औरंगाबाद: लोकसभा निवडणुका संपल्यावर आता राजकीय बेरीज-वजाबाकी सुरू झाली आहे. प्रत्येक बूथवर झालेले मतदान आणि तरुणांची भूमिका हेच आता राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहेत. अवघ्या सहा महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा झंजावात आटोपल्या नंतर राजकीय नेते मंडळी काहीशी रिलॅक्स मूडमध्ये आहे. मात्र, काही राजकीय पंडितांचा बूथ वाईज झालेल्या मतदानाचा अभ्यास सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, एमआयएम या प्रमुख पक्षांनी प्रत्येक बुथ वाईज झालेल्या मतदानाची बेरीज-वजाबाकी सुरू केली. यावेळी कधी नव्हे एवढा जातीय प्रचार झाला. त्या अनुषंगानेही बूथचाअभ्यास केला जात आहे. या निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या युथ ब्रिगेड वरही राजकीय पक्षांची नजर आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या मतदानाचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. जेवढी नजर बुथवर या मंडळींची आहे तेवढीच नजर परिसरातील तरुणांच्या भूमिकेकडेही आहे. नाराज आणि बंडाचा झेंडा उभारलेल्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी अशाप्रकारे मोर्चेबांधणी सुरू केल्याने कार्यकर्त्यांना पुन्हा बोलावणे धाडले जात असल्याचे दिसते. लोकसभेच्या निवडणुकीतच अनेकांनी आपल्या प्रचाराचा फंडा चाणाक्षपणे राबविला. कार्यकर्त्यांची जमवाजमव आणि पदांचे वाटपही अनेकांनी उरकून घेतले. या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने आता विधानसभेची तयारी करणे सोपे जाईल असे गणित मांडले जात आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बुथ आणि युथ हे फॅक्टर महत्त्वाचे ठरणार असल्याने चांगले रिझल्ट देणारे बूथ राजकीय नेत्यांनी हेरले आहेत. तर कमी मतदान झालेल्या बुथचा अभ्यास केला जात आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीची हवा विधानसभेपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न अनेकांकडून होणार यात शंका नाही.