औरंगाबाद: पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेले औरंगाबाद शहर बकाल झाले आहे. खड्ड्यांचे, कचर्याच्या दुर्गंधीचे शहर अशी बिरुदावली या शहराला चिकटली अन पर्यटकांचा ओघ कमी झाला. जगप्रसिद्ध वेरूळ -अजिंठा लेण्यामुळे हजारोंच्या संख्येने येणारे पर्यटक उत्पन्नाचा चांगला स्रोत होते. मात्र शहराच्या अधोगतीने स्त्रोत वाटला. त्यामुळेच नव्या खासदारांनी विमान महत्त्व मंत्र्यांची भेट घेत कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर आता उद्योग राज्यमंत्री अतुल सावे आणि मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनीही उड्डाणावर लक्ष केंद्रित केले आहे. नेत्यांचे हे उड्डाण प्रेम सर्वसामान्यांना मात्र हैराण करणारे आहे.
शहरात छोटे-मोठे प्रश्न दाटीवाटीने चालत असताना विमानसेवेच्या प्रश्नावर गंभीर होणार्या नेत्यांची किव करावी वाटते. पर्यटन क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. बकाल शहराचे रूप पालटणे महत्त्वाचे आहे. पाणी, कचरा, रस्त्यांचे प्रश्न सोडवले की शहराचा चेहरा मोहरा बदलेल यात शंका नाही. मग आपसुकच पर्यटनात वाढ होईल. दळणवळण सुविधा चांगली असली की पर्यटक कोणत्याही मार्गाने येण्यास तयार असतात. मात्र विमान सेवेवर ज्या पद्धतीने जोर देण्यात येत आहे त्यावरून राजकीय नेत्यांच्या हितसंबंधाची जपवणूक होते असे दिसते.
पावसाळा सुरू झाला तरी पिण्याच्या पाण्याचे हाल संपलेले नाहीत. कचरा प्रश्नावर कायमचा तोडगा अजूनही निघालेला नाही. लाख प्रयत्न करूनही रस्तोरस्ती कचर्याचे ढीग दिसतात. मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. रात्री दुचाकीवर चालवणेही अवघड झाले आहे. ड्रेनेज लाईन, गटार लाईन तुंबून साथ रोगांचा धोका आ वासून उभा आहे. महानगर पालिका आर्थिक दिवाळखोरीत निघण्याच्या स्थितीत आहे. विकास कामे ठप्प आहेत. अशावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येत जनतेला योग्य तो संदेश द्यायला हवा. मात्र सेना-भाजपाची तोंडे दक्षिणोत्तर आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वसामान्यांच्या प्रश्नात रस नाही. एमआयएमने तर अजून अजेंडाच ठरवलेला नाही. प्रमुख पक्षांची ही स्थिती शहरवासीयांचा भ्रमनिरास करणारी आहे, एवढे मात्र नक्की !
कुरघोडीचा प्रयत्न
दरम्यान एमआयएमचा लोकसभेतील विजय प्रमुख पक्षांना धक्का देणारा ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादीची हक्काची मते एमआयएमने पळविल्याने विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष गलितगात्र झालेले दिसतात. दुसरीकडे एमआयएमला टक्कर देणारे आम्हीच असे दाखवण्याची चढाओढ शिवसेना भाजपात लागली आहे. एकंदरीत प्रमुख चारही पक्षांची तोंडे चार दिशेला वळवून एमआयएमने मोठे यश मिळवले यात शंका नाही. विधानसभेपर्यंत ही स्थिती पालटेल असे तरी चित्र दिसत नाही. विमान सेवेच्या निमित्ताने भाजप आणि एमआयएम हे पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतात की काय, असे बोलले जाऊ लागले आहे.











