...आता हर्षवर्धन सपकाळ यांनी काढली मुख्यमंत्र्यांची लाज !! शहीद टिपु सुलतान मार्ग नावाचा भाजपचा दाखवला प्रस्ताव

Foto
मुंबई : मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनातील टिपू सुलतान याच्या प्रतिमेवरून सुरू झालेल्या वादाने काँग्रेस विरुद्ध भाजपा असे रुप घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान केल्यानंतर भाजपा आक्रमक झाली. भाजपाकडून कोंडी झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाने रस्त्याचे टिपू सुलतान मार्ग करण्याचा प्रस्ताव दाखवत घेरले आहे.

टिपू सुलतान मुद्द्यावरून भाजपा काँग्रेसविरोधात आक्रमक झाली. हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केले, त्याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांना आता हर्षवर्धन सपकाळ यांनी उलट सवाल केला आहे.
 
सपकाळ म्हणाले, तुम्हाला लाज वाटतेय का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी २०१३ मध्ये भाजपाने नामकरण करण्याच्या दिलेला प्रस्ताव आणि तो मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत शेअर केली.
 
सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटतेय का? २०१३ मध्ये मुंबईतील एम/पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफीनगर नाल्यापर्यंत जाणार्‍या शिवाजीनगर मार्ग क्र. ४ ह्यास शहीद टिपु सुलतान मार्ग असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून देण्यात आला होता.
 
रितू तावडे, अमित साटमांवर निशाणा

मुंबई महापालिकेच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून तो मंजूर झाला, तेव्हा आताच्या महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या. आणि या ठरावाला अनुमोदक होते आताचे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, असे सांगत सपकाळ यांनी महापौर तावडे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष साटम यांच्यावर निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटतेय का, राज्यात दंगली घडवण्यासाठी आपण व आपल्या पक्षाचे नेते प्रोत्साहन देत आहात. एका वक्तव्याचा विपर्यास करून राज्य जाळायला आपण तयार झाला आहात, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.
 
आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत, या जबाबदारीचे तरी भान राखा. आणि भाजपच्या गुंडांना दंगली घडवण्यासाठी प्रोत्साहन देणं थांबवा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे विसरू नका, राज्यातील जनतेला गुण्यागोविंदानं जगू द्या, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतानबद्दल काय बोलले होते?

मालेगाव महापालिकेतील प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे, असे विधान त्यांनी केले होते.