मृत प्राण्यांसाठी आता गॅस दाहिनी

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाळीव कुत्री, मांजरी व इतर प्राण्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कांचनवाडी परिसरात ५५ लाख रुपये खर्चून स्मशानभूमी विकसित होत आहे.
श्वान, मांजर, गायी अशा पाळीव प्राण्यांची मोठी संख्या आहे. या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची अनेकांची इच्छा असते. महापालिकेतर्फे आतापर्यंत तशी सोय नव्हती. शहरात बेवारस प्राणी मृत्युमुखी पडल्यानंतर नागरिक महापालिकेकडे तक्रारी करतात. अनेकवेळा नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेतर्फे मृत प्राणी नारेगाव येथील कचरा डेपोवर टाकले जात होते. आता नारेगाव येथील कचरा डेपो बंद आहे. त्यामुळे पडेगाव परिसरात मृत प्राणी पुरून विल्हेवाट लावली जात होती. दरम्यान, पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार चिकलठाणा येथील कचरा डेपोलगत जागा निश्चित केली. मात्र, तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी त्यात बदल करत पडेगाव येथील कचरा डेपो पोलगतची जागा अंतिम केली, पण त्याठिकाणी स्मशानभूमीला विरोध झाला. त्यानंतर कांचनवाडी परिसरातील जागा अंतिम करून हे काम पुणे येथील कल्याणी एंटरप्राइजेसला देण्यात आले. ५५ लाखांचा खर्च करून या एजन्सीने शेड उभारून गॅस दाहिनी बसविली आहे. याठिकाणी आठवडाभरात लाइटचे काम पूर्ण झाल्यानंतर गॅस दाहिनीचा वापर सुरू केला जाऊ शकतो, असे कंपनीचे भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले.