राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मराठवाड्यातून क्षीरसागरांचा नंबर?

Foto

औरंगाबाद:  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने 48 पैकी 41 जागांवर विजय प्राप्त केला. युतीच्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही युतीला मोठे यश प्राप्त व्हावे यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले बीडचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांची वर्णी लागणार असल्याचे निश्‍चित झाले असल्याची माहिती सुत्रांकडून कळते, तर जिल्ह्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आ. संजय शिरसाट व भाजपाचे अतुल सावे हेही मंत्रीपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

नुकत्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. राज्यात युती सरकारने चांगली कामगिरी केल्याने घवघवीत यश मिळाले. आता विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्याने होणार आहेत. विधानसभेत ही मोठा विजय मिळविण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांतर्फे प्रयत्न सुरु झाला आहे. राज्यात मंत्र्याची पाच पदे रिक्त आहेत. साडेचार वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचे गाजर दाखविले. पण आता विधानसभेच्या तोंडावर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचे निश्‍चित झाले आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रीमंडळात शिवसेनेकडून जयदत्त क्षिरसागर यांना स्नि देण्याचे निश्‍चित झाले असल्याचे बोलले जाते. औरंगाबाद जिल्हा हा मराठवाड्याच्या राजधानीचे प्रमुख शहर आहे. येथून विभागात राजकीय पडसाद उमटतात. पण युतीच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातुन एकालाही मंत्रीपद दिलेले नाही. विधानसभेचा कार्यकाळ सहा महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यासाठी का होईना मंत्रीपद मिळावे यासाठी सेनेचे आ. शिरसाट व भाजपाचे आ. अतुल सावे प्रयत्न करीत आहेत. 

खैरेंचे राजकीय पुनर्वसन?
यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे पराभूत झाले. जिल्ह्यातील शिवसेना प्रबळ राहावी व सेनेचा दबदबा कायम रहावा यासाठी खैरे यांना राज्य मंत्रीमंडळात घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पण या निवडणुकीत अमरावतीतून खा. आनंदराव आडसुळ, शिरुरमधून शिवाजीराव आढळ पाटील व रायगडमधून विद्यमान केंद्रिय मंत्री अनंत गीत यांच्यासारखी सेनेतील मातब्बर नेते मंडळीही पराभूत झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत विचार शिवसेनेला केला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.