पैठण, (प्रतिनिधी): सोशल मीडियावर आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे तसेच मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाज, पैठणच्या वतीने पैठण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राजू थाटे (रा. मिलिंदनगर) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये एका आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तसेच मातंग समाजाचा अवमान होईल अशा शब्दांचा वापर करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित व्हिडिओमध्ये समाजाला उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरत आझाद मैदानात येण्याचे आव्हान देण्यात आल्याचा तसेच समाजामध्ये तेढ निर्माण होईल, सामाजिक सलोखा बिघडेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य त्या कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी अविनाश मिसाळ, नामदेव शरणागत, सुनिल चव्हाण, गणेश मातंग, उल्हास नवगिरे, अतिष अहिरे, लहू गवळी, देविदास अहिरे, अमोल ताकवाले, ज्ञानेश्वर मिसाळ, शुभम चव्हाण, अनिल त्रिभुवन, आकाश ताकवाले, अक्षय लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रेमराज अहिरे, सनी ससाणे, ब्रम्हदेव बर्डे, अक्षय गोरे, अविनाश मिसाळ आदी समाजबांधव उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.