नव्या जलवाहिनीत अडथळ्यांची शर्यत एअर व्हॉल्व्हला लागली गळती; नव्या पाणीपुरवठा योजनेत पुन्हा अडथळा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या २,५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी घेतली जात आहे. रविवारी (दि.५) जलवाहिनीद्वारे फारोळ्यापर्यंत पाणी आले होते. याठिकाणी स्क्रोल व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर पडले. त्यानंतर स्क्रोल व्हॉल्व्ह बंद करून जलवाहिनीतून पाणी पुढे आणताना एअर व्हॉल्व्ह बंद न केल्यामुळे त्यातून पाणी बाहेर पडले. त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यात हे पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी दिवसभर जीव्हीपीआर कंपनीने प्रयत्न केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सोमवारी (दि. ६) चाचणी घेता आली नाही.
शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी गुढी पाडव्यापासून चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. १९ मार्चला जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले, त्यानंतर २३
मार्चला पंपांची चाचणी घेण्यात आली आणि २,५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहराकडे पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या जरलवाहिनीतून २८ किलोमीटर अंतर पार करीत फारोळा येथे पाणी आणण्यात आले. त्यापुढे पाणी आणताना फारोळ्याजवळच दोन व्हॉल्व्ह लावण्यात आले. त्यातील ६०० मिलिमीटर व्यासाचा एअर व्हॉल्व्ह बंद करण्यात आला नाही. या व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर पडले. जलवाहिनीतून वेगाने आलेल्या पाण्यामुळे व्हॉल्व्हजवळ पाण्याचे तळे तयार झाले. त्यात व्हॉल्व्ह देखील बुडाला. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. व्हॉल्व्ह बंद करणे गरजेचे असल्याने साचलेले पाणी उपसणे गरजेचे होते. त्यामुळे पाणी उपसा करण्यासाठी पंप मागविण्यात आला. पाणी उपसा सुरू करण्यात आला. पण, जलवाहिनीतून पाणी येत असल्याने खड्ड्यातील पाणी कायम राहिले. त्यानंतर पाणी उपसा करण्यासाठी सोमवारी सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू झाले.