भरदिवसा हिसकावली वृद्धेची सोनसाखळी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): घराकडे पायी निघालेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी, तुळशीची माळ दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी दहाच्या सुमारास भगवती कॉलनीत घडली.
याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहिनी मोहन पाठक (वय ६९, रा. चित्रांगण बिल्डिंग, श्री समर्थ या हाऊसिंग सोसायटी) नेहमीप्रमाणे ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
तेथून सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास घराकडे जाण्यासाठी त्या निघाल्या. भगवती कॉलनीच्या पाठीमागून पायी जात असताना दोन चोरटे दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागून
आले. चोरटे दुचाकीने आधी पुढे गेले, मात्र काही अंतरावर जाऊन ते पुन्हा माघारी फिरले. मोहिनी पाठक यांच्यापासून काही अंतरावर त्यांनी आपली दुचाकी उभी केली.
त्यापैकी एक चोरटा पायीच त्यांच्यासोबत चालत निघाला. संधी साधून त्याने अचानक मोहिनी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि चांदीची तुळशीची माळ हिसकावली. त्यानंतर तो साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला.
अधिक तपास हवालदार मनोज उईक करत आहेत.
चप्पल हातात घेऊन...
मोहिनी यांच्यासोबत एक चोरटा पळता यावे म्हणून स्वतःची चप्पल चक्क हातात घेऊन काही अंतरापर्यंत चालत होता. त्याने अचानक मोहिनी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघे पसार झाले.
चोर हाती लागेना..
गेल्या काही महिन्यांत मंगळसूत्र चोरांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषतः जवाहर नगर भाग चेनस्नॅचर्सने टार्गे ट केलेला आहे. अनेक घटना घडल्या. मात्र, एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. रस्त्यावर पोलिसांची गस्त नसल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions