मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार असून जिल्हाध्यक्षांना त्याचे अधिकार असतील असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण असं करताना महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. भाजपने ज्या ठिकाणी शक्य तिथे युती करण्याची भूमिका जाहीर केली आहे. विधानसभेत मॅजिक फिगर गाठणाऱ्या भाजपला मिनी मंत्रालयासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा हवा आहे. त्यादृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे म्हणतात. तसंच काहीसं धोरण भाजपने स्वीकारल्याचे दिसून येते. या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी खेळली आहे.
निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या, हा निर्णय जिल्हा पातळीवर ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांवर निवडणूक लढण्याचा निर्णय सोपवण्यात आला आहे. पण असं करताना आपण महायुतीत आहोत याचे भान ठेऊन लढावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
नव्यांचा प्रवेश करून घ्या
आपण जर वेगवेगळं लढलो तरी महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. नव्या लोकांचा प्रवेश करून घ्या, प्रवेश करून घेताना जुन्या लोकांनी त्यांना स्वीकारावे आणि संघटना वाढवावी असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं. आपण महायुतीतत आहोत याचं भान ठेवा आणि टीका करा असा सल्लाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हा सल्ला दिल्याची चर्चा आहे.
महायुतीतूनच लढावे लागेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्या ॲक्शन मोडवर आहेत. सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी कार्यकर्त्यांचा मूड चाचपणं सुरु आहे. एक वेळ शिंदे चालतील पण अजितदादांसोबत जाणं नको अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र काहीही झालं तरी महायुतीत लढायचे हा संदेश भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मुख्य नेते देत आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. पदाधिकाऱ्यांची कितीही इच्छा असली तरी निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्या लागणार आहेत. याची जाणीव तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच स्वबळाची भाषा मोठे नेते सध्यातरी करताना दिसत नाहीत.
कार्यकर्त्यांमध्ये चिंता...
दरम्यान काल पुण्यात बोलताना, मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये कुठलाही स्ट्राँग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे. साधारणपणे भाजपमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत ते लोकांना सामावून घेतात. त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे. एखाद्या ठिकाणी काही नाराजी जरी असली तर आम्ही समजावतो आणि तेदेखील समजतात, असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
जिल्हा परिषदांपासून ते महापालिका निवडणुका होणार असल्याने मिनी विधानसभा निवडणुकीचे चित्र आहे. युती-आघाडीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही पक्षांमध्ये स्वबळाचा नारा पक्षात दिला जात आहे. भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महायुतीतील आपले भिडू एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना या निमित्ताने धोबीपछाड देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण मुंबईसह कोकणातही शतप्रतिशत भाजप सत्तेवर आणण्यासाठी रणनीती सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.