शासनाकडून निधी मिळूनही नियोजनाअभावी बिकट अवस्था
दररोज होतात अनेक ठिकाणी अपघात
पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खिळखिळे झाले आहेत. राष्ट्रीय मार्गासह अंतर्गत बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे दर तासाला अपघात होत आहेत. त्यात निष्पाप माणसांचे बळी जात आहेत. तर काही जण जखमी होऊन कायमचे अपंग होत आहे. राज्य सरकारकडून रस्त्यांसाठी निधी मिळूनही येथील लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाकडे योग्य नियोजन नसल्याने रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली आहे.
औरंगाबाद हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. येथील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्मार्ट शहर योजनेत शहराचा समावेश करण्यात आला आहे. पण शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून हे स्मार्ट शहर तर नाही उलट खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शहरातून सोलापूर-धुळे हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग जातो. पण या रस्त्यावर आज दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. शहरातून जाणारा हा महामार्ग आहे. त्यामुळे शहरातील लाखो नागरिक या रस्त्याचा वापर करतात. सातारा-देवळाई परिसरातील अनेक कॉलन्यातील लोक दररोज शहरातून येण्या-जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. पण या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात झाले. या अपघातांत परिसरातील शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यांत मुरुम, माती टाकून तात्पुरती डागडूजी केली जाते. पाऊस पडल्यावर पुन्हा ही माती वाहून जाते. त्यामुळे पुन्हा रस्ता खड्डेमय होत आहे.
शहरातील रस्तेही खड्डेमय
राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खड्डेमय आहे. तशीच अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे. सिडको बस स्थानक ते हर्सूल टी पॉईंटकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डे पडून खिळखिळा झाला आहे. याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोंढ्यातील रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाली आहे. गेल्या आठवड्यात येथील व्यापार्यांनी रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलन केले. बाबा पेट्रोल पंपाकडून नगरनाक्याकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गुलमडीकडून मोढ्याकडे जाणारा मार्ग अंगुरीबाग, किलेअर्क रोड, बुढीलेन रोड, गारखेडा चौक ते शहानूरमियॉ दर्गा रोड, जय भवानीनगर रोड, उस्मानपुर्यातील आनंद गाडे चौक ते सातारा रेल्वे गेट रोड, सिडको, हडको, मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रोड यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झालेली दिसून येत आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खड्डे चुकविताना अपघात होऊन निष्पापांचे बळी जात आहेत.
खड्डे अजून किती जणांना जखमी करणार?
औरंगाबाद ऐतिहासिक शहर, पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अजूनही प्रशासन चकचकीत रस्ते करण्यात व खड्डे बुजवण्यात अपयशी ठरली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर एक एक फुट खोल खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे रोज छोटे मोठे अपघात घडतांना दिसत आहे.खड्डयांमुळे आमचा जीव गेल्यास महानगरपालिकेस जबाबदार धरावे का? असा प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी पैठण लिंक रोड एमआयडीसी परिसरात नाथ ग्रुपसमोरुन येणार्या दुचाकीधारकाचा अपघात झाला. याठिकाणी अनेक दिवसांपासून दोन मोठे खड्डे पडले आहेत.रात्रीच्या वेळी इथून जातांना अंधारात खड्डयांचा अंदाज न आल्याने सदर नागरिक दुचाकीसहित कोसळून रक्तबंबाळ झाला.वेळीच उपचार मिळाल्याने सदर व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. मात्र याठिकाणी असलेले मोठमोठे खड्डे अजूनही तसेच आहेत.अजून किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर मनपा प्रशासनास जाग येईल असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित होत आहे.