औरंगाबाद- परप्रांतीयांना राज्यातून
हाकलण्याबाबत चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल दोषारोपपत्र मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. के. एल. वडणे यांनी आज रद्द केले.
२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांना
राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर २००८
रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे परत येत असताना बदनापूर येथे १० ते १५
लोकांनी 'राज ठाकरे झिंदाबाद ' अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली तसेच 'राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना' राज्यातून हाकला असा आदेश राज ठाकरे
यांनी दिला असल्याचे घोषणा दिल्या. या विरुद्ध बस चालक अंबादास तेलंगरे यांनी
त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १०-
ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादवी कलम ३३६, १४३, १०९ , ११४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विषयक कायद्याचे कलम ३ आणि ४ तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५
नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ३० जानेवारी २०९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट ( नॉन बेलेबल ) जारी केले. राज ठाकरे यांच्यावतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला












