औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या वतीने 1 जुलैपासून ते 30 सप्टेंबर पर्यंत 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. परंतु पहिल्या दिवशी जबाबदार स्थानिक संस्था जिल्हा परिषद कार्यालयातंर्गतच्या एकाही विभागात दुपारपर्यंत एकही वृक्षाचे रोपन न झाल्याचे दिसुन आले. 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्याचे कार्यक्रम शहरातील काही शाळांमध्ये साजरे करण्यात आले. यामुळे वृक्ष लागवड वा या विषयीची जनजागृतीचा एकही कार्यक्रम 1 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयात दिसुन आला नाही.
वनविभागाचा उद्देश उदात्त नियोजनात मात्र कसुर
महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत सन 2017 ते 2019 या तीन वर्षात महाराष्ट्रात 50 कोटी वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आहे. यामध्ये सन 2017 मध्ये 4 कोटी, 2018 मध्ये 13 कोटी झाडे लावायची होती. आणि आता 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्ळप आहे. या संकल्पपुर्तीसाठी ठिकठिकाणच्या रोपवाटिकामध्ये रोपे उगवली जातात परंतु त्यांच्या वितरणात नियोजनबद्धता दिसुन येत नाही.
जिल्हा परिषद शाळा प्रशासन अनभिज्ञ
विविध सामाजिक, सेवाभावी, स्वयंसेवी संघटना, शासकिय निमशासकीय कार्यालये ग्रामपंचायत संस्थाच्या मार्फत सदर वृक्षारोपण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते यावर्षी मात्र या वृक्षारोपणासंबंधी अधिकची जनजागृती झालेली दिसत नाही. जि.प. शिक्षण अधिकार्यांनी मुख्याध्यापक शिक्षकांची आठ ते दहा दिवसापुर्वीच बैठक घेऊन वृक्षारोपणाचे नियोजन करण्यास हवे होते. परंतु तसे घडले नाही तसे सुचनापत्रसुद्धा काही मुख्याध्यापकांना मिळाले नाही. यामुळे वृक्ष कोठून मिळवायचे असा प्रश्न आहे. आगामी दोन महिन्यात हे सर्व घडेल परंतु यंदाच्या वृक्षारोपणाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक अनभिज्ञ आहेत असे काही मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांजवार्ता प्रतिनिधीस सांगितले.











