शेतकरी जातो जीवानिशी !

Foto
            महाविकास आघाडी एकीकडे कासव गतीने शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करीत आहे, तर दुसरीकडे अनेक कारणे देत बँका पूर्ण कर्जमाफी नाकारत आहेत. त्याचवेळी नापिकी, सावकारी तगादा आणि ‘मार्च एण्ड’ला होणा-या वसुलीच्या धास्तीने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यातली धक्कादायक बाब म्हणजे बळीराजा आस्मानी आणि सुलतानी संकटाने इतका अगतिक झाला आहे की, तो आता जीवानिशी जाताना एकटा जात नाही, तर सोबतीला हातातोंडाशी आलेल्या कोवळ्या लेकरांनाही पोटाशी कवटाळून मरणाला जवळ करीत आहे. या दाहक परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणाकडेच कसलाच उपाय नाही का, असा आर्त सवाल मागे उरलेले बळीराजाचे पोरके कुटुंबीय विचारत आहे. महाविकास आघाडी सरकारने बळीराजाचा कैवार घेत सत्ता स्थापन केली, सत्तेवर आल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपता संपता त्यांना उपरती झाली अन् शेतक-यांना दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली. मात्र या घोषणेची प्रत्यक्ष किंचित अंमलबजावणी व्हायला फेब्रुवारी महिना उजाडला. फेब्रुवारीत सुरू असणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 ची 15 हजार 358 शेतक-यांची पहिली यादी जाहीर केली. दुसरी यादी 29 फेब्रुवारीला जाहीर झाली. या यादीत नगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार, वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 42 हजार 913 शेतक-यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण 34 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना त्यापैकी फक्त सुमारे 4 लाख शेतक-यांची यादी जाहीर करून महाविकास आघाडी सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. ज्या शेतक-यांची नावे या पहिल्या यादीत आहेत, त्यातील कित्येक शेतक-यांना बँकांनी अनेक कारणे देत संपूर्ण कर्जमाफी दिलेलीच नाही, तर अनेक शेतक-यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचे आढळून आल्याने यादीत नाव असले तरीही कर्जमाफीची रक्कम त्यांना मिळणार नसल्याचे समोर येत आहे. कोरडी पडलेली शेती, उपाशी जनावरे, राज्यातील अनेक भागात आतापासूनच जाणवणारी पाण्याची टंचाई, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, सार्वजनिक पाणी वितरणातील अडथळे अशा अनेक संकटाने अगतिक झालेल्या बळीराजासमोर जगायचे कसे यापेक्षा आता मरायचे तर एकटयाने की घरादाराने अशा ज्वलंत प्रश्नांचे काहूर माजले आहे. याचे उत्तर कोण देणार, याच अगतिकतेतून राज्यभरात एकीकडे टप्प्या-टप्प्याने कर्जमाफी यादी जाहीर होत आहे, तर दुसरीकडे शेतकरी हतबलतेपायी आपला जीव देत आहे. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमान नगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. प्रशांत बटुळेने शेतक-याने आत्महत्या करू नये असे आवाहन करणारी एक स्वरचित कविता आपल्या वर्गात सादर केली. मात्र त्याच रात्री आपले वडीलच या वास्तवाचे दर्शन आपल्याला करून देतील याची कल्पना त्या कोवळ्या जीवाला नव्हती. त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी त्याच रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली.  यातील विदारक वास्तव सत्ताधा-यांना कधीच कळणार नाही का, हाच प्रश्न पोरकी झालेली बळीराजाची बायका-मुले विचारत आहेत. 31 मार्चपर्यंत राज्यातील उर्वरित 34 लाख शेतक-यांपर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी योग्यरीत्या पोहोचली नाही, इतकी सक्षमता शेतक-यांना देण्यासाठी शेतीमालाला हमीभाव, सकस बियाणांचा पुरवठा, माती परीक्षण, मातीचा पोत सुधारण्यासाठी मार्गदर्शन, विविध आंतर पिकांबाबतची जागृती, नाशवंत फळभाजी पिकांसाठी साठवण क्षमता वाढवणे; पीक विमा, पीक कर्जाची त्वरित उपलब्धता, शेती सामग्रीची सहज आणि परवडणा-या दरातील उपलब्धता, सरकारी योजनांची शेवटच्या घटकापर्यंत होणारी अंमलबजावणी आदी अनेक मार्गाने शेतक-याला सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतमालाबाबतचे योग्य धोरण, हमीभाव आदींची हमी जाहीर केली असली तरी ती शेतक-यांच्या पदरात पडतेच असे नाही. या सर्व अस्थिरतेच्या गर्तेतूत शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी मोठया प्रमाणात उपाययोजना कराव्या लागतील. महाराष्ट्रात आजतागायत सर्व प्रकारच्या आत्महत्यांमध्ये शेतक-यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठा आणि गंभीर बनत चालला आहे. हे रोखायचे असेल, तर बळीराजाच्या उन्नतीसाठी राजकीय संधीसाधूपणा बाजूला ठेवून सर्वपक्षीय प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker