औरंगाबाद: मंगळवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळल्याची घटना आज पहाटे माळीवाडा भागात उघडकीस आली. तोल जाऊन विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुलाब धनसिंग राठोड वय-४० (माळीवाडा, जी.औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मृत गुलाब हे मंगळवारी दुपारी चार वाजेपासून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. माळीवाडा भागातील केसापुरी तांडा भागात एका शेतात विहीर बांधणीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम करणारे कामगार आज सकाळी प्रांतविधीसाठी जात असताना त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत एका पुरुषाचा तरंगत असलेला मृतदेह आढळला. याबाबत कामगारांनी पोलिसांना माहिती दिली. दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविले आहे. गुलाबचा तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.