फुलंब्री, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू सुधाकर जिरेकर (रा. भटनगर, दत्त मंदिर परिसर, नारेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १५) पहाटे सुमारे ३.४५ वाजता फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावंगी इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४२१.८ येथे एक व्यक्ती रस्त्यावर मृत अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर फुलंब्री पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
मृत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख राजू सुधाकर जिरेकर अशी पटली. सदर व्यक्तीस रुग्णवाहिकेद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों कैलास राठोड करत आहेत.














