एक हजार अवैध नळ कनेक्शन होणार बंद

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः शहरात मुख्य लाईनवर अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या कनेक्शनमुळे नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी भरणार्‍या नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन (संयोजन) तोडण्याची मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागात पुढील आठवड्याभरात ही मोहिम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करूनही नवीन पाणीपुरवठा योजनेचे २०० एमएलडी वाढीव पाणी शहराला मिळालेले नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध होणार्‍या पाण्याचे समन्यायी वाटप, वितरण व्यवस्थेतील गळती रोखणे आणि अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करणे यावर भर दिला जात आहे. मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन घेतलेल्या नागरिकांना जास्त पाणी मिळते, तर इतर भागात सहा-आठ दिवसांनी दोन-तीन तासच पाणी येते. तेदेखील कमी दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
हजारावर अवैध जोडणी
मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदवाडी, सिल्कमिल कॉलनी, रेल्वेस्टेशन, जयभवानीनगर, संजयनगर, रोशनगेट, कटकटगेट, बुढीलेन या भागात जलकुंभातून वसाहतीला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीवरच अवैध नळ कनेक्शन आहेत. ही संख्या सुमारे १ हजारांच्या घरात आहे, असा अंदाजही वर्तविला जात आहे. पुढील आठवड्यापासून ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.