मराठवाड्यात तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने चारा छावण्या सुरु करण्याचे शासनाचे आदेश प्रशासनाने मात्र धाब्यावर बसविले आहेत. मराठवाड्यातील केवळ बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.तर तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईने त्रस्त औरंगाबाद जालना या जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झाली नाही, हे विशेष !
मराठवाड्यात सरासरीच्या केवळ 62 टक्के पाऊस झाला. मध्यम तसेच लघु प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. औरंगाबाद जालना जिल्ह्यात परिस्थिती भयंकर आहे. या जिल्ह्यात सरासरीच्या 50 टक्के ही पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपातील चारा वर्गीय पिके नाहीशी झाली तर रब्बी हंगामही पाण्याअभावी येऊ शकला नाही. अशा परिस्थितीत शेतकर्यांकडे जेमतेम दोन ते तीन महिने पुरेल एवढा चारा शिल्लक होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जनावरांची संख्या आणि उपलब्ध चारा याचे गणित मांडले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याची ग्वाही त्यावेळी जिल्हा प्रशासनाने दिली होती. म्हणजेच मार्च महिन्यात जनावरांसाठी चारा सुरु छावण्या सुरु करणे क्रमप्राप्त होते. मात्र, मार्च महिना संपत आला तरी औरंगाबाद अथवा जालना जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. शासनाचे आदेश असूनही प्रशासनाने मात्र या आदेशालाच हरताळ फासला. या दोन जिल्ह्यांबरोबरच परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातही अद्याप चारा छावणी सुरू झालेली नाही.